'बिग बॉस'च्या घरात शिवानी सुर्वेला 'ड्रामा क्वीन' म्हणून ओळखले जाते. छोट्या छोट्या गोष्टीवरून घरात भांडणं आणि वादावादी करण्यात शिवानी नेहमी आघाडीवर असते. तसेच किरकोळ गोष्टींवरून शिवानी डोळ्यातून पाणी काढत असते. या सर्व गोष्टींमुळे शिवानीला घरात आणि घराबाहेर अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रियांचा सामना करावा लागत आहे.
सध्या शिवानी वारंवार बिग बॉससमोर मला घरी जायचंय अशी विनंती करताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात शिवानीला मानसिक आणि शारीरिक त्रासाचा सामना करावा लागत असल्याने, शिवानीने बिग बॉसला घरी पाठवण्याची विनंती केली. सूत्रांच्या माहितीनुसार शिवानीला दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय तातडीसाठी 'कोकिलाबेन हॉस्पिटल'मध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं. तिथे उपचार घेऊन शिवानी पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल झाली. त्यावेळी अजिंक्य आणि शिवानी हे एकमेकांशी फोनवर बोलले आणि अजिंक्यने शिवानीला धीर दिला.
एकंदरीत शिवानीच्या या सर्व स्वभावाच्या पैलूबद्दल एका आघाडीच्या वृत्तपत्राने शिवनीचा बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेची मुलाखत घेतली, तेव्हा अजिंक्य म्हणाला,''मी तिला म्हणालो की, की तू या शो मध्ये एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहेस. तिच्या दृष्टीने सर्वजण तिचे प्रतिस्पर्धी असल्याने ती प्रत्येकाशी एका विशिष्ट दृष्टिकोनातून वागत असते. पण घरात ती जशी वागते तशी बाहेर वागत नाही. बाहेर ती तिच्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा आदर करते.''
अजिंक्य पुढे म्हणाला,''चोवीस तास एका बंदिस्त घरात राहणं हे तिच्यासाठी खूप अवघड असल्याचं ती म्हणाली. तिला बिग बॉसचा फक्त अनुभव घ्यायचा होता. आणि आता तिने तो घेतला आहे. बिग बॉसचा शो हा तिच्यासाठी नाही, असं तिला वाटत आहे. परंतु मी तिला कणखर होण्यास सांगितलं असून आम्ही सर्व तिच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.''
''तिच्यात खूप आत्मविश्वास असून ती खुप प्रेमळ आहे. व्ययक्तिक आणि कौटुंबिक जीवनात ती अनेक अडचणींचा एकटीने सामना करत आहे. तिच्या आयुष्यात जर नकारात्मक गोष्टी आल्या तर मात्र ती संपूर्ण खचून जाते. त्यावेळी तिला सावरणं खूप कठीण असतं. कारण ती त्यावेळेस मानसिकरित्या कोलमडते.'' असं मत अजिंक्यने शिवानीबद्दल व्यक्त केलं.
अजिंक्य आणि शिवानी गेल्या चार वर्षांपासून एकत्र आहेत. 'तू जीवाला गुंतवावे' या मालिकेच्या शूटिंगच्या दरम्यान शिवानी आणि अजिंक्य यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.
अजिंक्य हा गेली अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. परंतु त्याला हवी तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यामुळे बिग बॉसच्या माध्यमातून शिवानी अजिंक्यला प्रकाशझोतात आणत आहे का, अशीही दाट शंका वर्तवण्यात येत आहे. एकूणच शिवानी बिग बॉसच्या घरात कोणती स्ट्रॅटेजी वापरात आहे, हे ओळखणं खूप कठीण आहे. तसेच अजिंक्यने शिवानीला सांगितलेला सल्ला ती मानते का? की यापुढेही ती घराबाहेर जाण्याची विनंती बिग बॉसना करणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी कुतूहलाचा विषय असणार आहे.