By  
on  

PeepingMoon 2020 : या कलाकारांनी केल्या होत्या एकमेकांवर टीका, यावर्षी अशी पडली होती वादाची ठिणगी 

 2020 हे वर्ष अनेक वाईट, चांगल्या गोष्टींसाठी चर्चेत राहिलं. कोरोनाग्रस्त परिस्थितीला तोंड देत असताना मराठी मनोरंजन विश्वालाही विविध अडचणींना सामोरं जावं लागत होतं. यातच यावर्षात अनेक वादग्रस्त गोष्टी घडल्या. काही कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप करताना दिसले.

महेश टिळेकर आणि केतकी चितळे 
छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करण्याची हिंमत तशी कुणी करत नाही आणि जर केली तर त्यानंतरचे वाईट परिणामही अनेकदा पाहायला मिळाले आहेत. स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआला देखील छत्रपती शिवरायांवर केलेल्या थट्टेमुळे त्याचे परिणाम भोगावे लागले. त्यानंतर अग्रिमाने शिवप्रेमींची माफी मागीतली होती. मात्र या मुद्दात अभिनेत्री केतकी चितळेने उडी घेतली आणि वादात सापडली. केतकी चितळेच्या बाबतीतही असच झालं. केतकी ही अनेकदा तिच्या सोशल मिडीयावरील वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असते. यावर्षी केतकीने एका पोस्टमध्ये छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला होता. तिच्या या पोस्टमुळे शिवप्रेमी नाराज झाले आणि फोनवरही तिला धमक्या येऊ लागल्या. यानंतर तिला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं. या प्रकरणात पुढे दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर यांनीही केतकीवर टीका केली. टिळेकर यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट करून संताप व्यक्त केला होता आणि केतकीला खडेबोल सुनावले होते. लहानपणी जसा पोलिओचा डोस दिला जातो तसा डोस केतकीला वेळेवर दिला गेला नाहीये असेही टिळेकर म्हटले होते. 

 

प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल 
लॉकडाउनच्या काळात अनेक कलाकारांना विविध अडचणींना सामोरं जावं लागलं. एकीकडे मनोरंजन विश्व ठप्प असताना काम नसल्याने अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं. अनलॉक झाल्यानंतर चित्रीकरणालाही सुरुवात झाली. मात्र यातच एक मोठा वाद चर्चेत राहिला. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेचं चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यात आलं आणि मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर या मालिकेत एक वादाची ठिणगी पडली. या मालिकेत आर्याची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि निर्मात्या अभिनेत्री अलका कुबल यांचे आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु झाले होते. प्राजक्ताने ही मालिका सोडली असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र तिने मालिका सोडली नसून तिला काढून टाकण्यात आल्याचं मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी सांगितलं. या मालिकेचे कलाकार शिवीगाळ करत असल्याचा आरोप प्राजक्ताने केला होता. त्यानंतर अनेक मुलाखतीत अलका कुबल यांनी प्राजक्ताच्या वागणुकीचे विविध खुलासे केले. सेटवर विचीत्र वागणे, उशीरा येणे आणि तिच्या कामात आईचा हस्तक्षेप असणे या गोष्टी त्यांनी उघडकीस आणल्या. तर प्राजक्ताने एका प्रकरणाचा उल्लेख करत सहकलाकार विवेक सांगळेवरही शिवीगाळीचे आरोप केले. त्यानंतर विवेक सांगळेनेही अनेक मुलाखतीतून त्याची बाजू मांडली. मग प्राजक्ताने एक पत्रकार परिषद घेऊन तिची बाजू मांडली. आरोप-प्रत्यारोप होतच राहिले. यात अलका कुबल यांना विविध संघटनांच्या धमक्याही येऊ लागल्या. तर सोशल मिडीयावर विवेक सांगळे आणि अलका कुबल यांचं ट्रोलिंगही सुरु झालं. मात्र या प्रकरणात अखेरीस प्राजक्ताच्या जागी अभिनेत्री वीणा जगतापला ही भूमिका मिळाली आणि वीणा आता ‘आई माझी काळूबाई’ मालिकेत आर्याच्या भूमिकेत दिसत आहे. 

 

शशांक केतकर आणि पूजा पवार
यावर्षी मराठी कलाविश्वात आणखी एक वाद चर्चेत राहिला. पण त्या वादाला पूर्णविराम देण्यासाठी अभिनेता शशांक केतकरने पुढाकार घेतला. फिल्म इंडस्ट्रीमधील नवोदित कलाकार हे जाणकार कलाकारांचा सन्मान करत नाहीत असा आरोप अभिनेत्री पूजा पवार यांनी केली आहे. एका मालिकेत पूजा यांनी शशांकच्या आईची भूमिका केली होती. एकदा शशांकचं नाटक पाहण्यासाठी पूजा गेल्या असता त्या जेव्हा शशांकला भेटल्या तेव्हा शशांकने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं असल्याचं पूजा यांनी त्यांच्या सोशल मिडीया पोस्टमधून सांगितलं होतं. या गोष्टींचं पूजा यांना वाईट वाटल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यांची ही पोस्ट दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर यांनी शेयर केली होती. याविषयी कळल्यानंतर आणि ही पोस्ट पाहिल्यानंतर शशांकने पूजा यांची माफी मागून दिलगिरी व्यक्त केली. यात त्याने लिहीलं होतं की, “पूजा पवार यांच्याकडे पाहून मी दुर्लक्ष केले असेलही. पण ते जाणूनबुजून केले नसावे. माझ्याकडून असे काही घडले असेल तर मी मनापासून माफी मागतो. पूजा ताई नाटकाला आली होती आणि मी बोललोही होतो, असे मला तरी आठवतेय. असो, मोठ्यांचा आदर करण्याबद्दल बोलाल तर मला व्यक्तिश: ओळखतात ते माझ्या मागेही सांगतील की मी तसा नाही. नाटकाला आलेला अगदी शेवटचा प्रेक्षक भेटून बाहेर पडल्याशिवाय मी थिएटरमधून बाहेर पडत नाही. तरीही मी पूजा ताईना स्वत: फोन करून घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त करने.” याशिवाय कमेंट करणाऱ्यांनाही ऐकीव गोष्टींवर पर्सनल गोष्टींवर प्रतिक्रिया न देण्याची विनंती या पोस्टमध्ये केली होती. त्यानंतर पूजा पवार यांनी त्यांची ती पोस्ट काढून टाकली होती. 

 

महेश टिळेकर – आरोह वेलणकर
सोशल मिडीयावर होणार वाद काही नवी नाही. मात्र जेव्हा प्रसिद्ध कलाकार एकमेकांवर सोशल मिडीयावर टीका करतात तेव्हा त्याची चर्चा होते. अभिनेता आरोह वेलणकर आणि दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर यांच्याबाबतीतही हे झालय. अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्यावर महेश टिळेकर यांनी पोस्ट केली होती.  ‘तिला जगू द्या’ या अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं. यात महेश टिळेकर यांनीही टीका करत “हीला नको गाऊ द्या” अशी पोस्ट केली होती. त्यानंतर टिळेकरांच्या या पोस्टवर अभिनेता आरोह वेलणकरने टीका केली. आरोहने पोस्टमध्ये लिहीलं होतं की, “महेश टिळेकर तुमची टीका वाचून लाज वाटली. मराठी तारका नावाचा कार्यक्रम करता, स्त्री शक्ती, सम्मानाच्या गोष्टी करता, आणि ही कसली भाषा तुमची? नसेल आवडत तर नका एैकू, टीका करायची तर तमा बाळगून करा! कोण समजता तुम्ही स्वत:ला! ह्या आधी व्हाया व्हाया माझ्यावरही आणि काही नटांवर तुम्ही अशीच टीका केली होती, तेव्हा दुर्लक्ष केलं.सुधरा... राहीला प्रश्न मराठी तारकांचा, तर ह्या पुढे ह्या तुमच्या स्टंटमुळे तुमच्या कार्यक्रमात कोण काम करतय बघू!” त्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंगही मिळाला. या वादात आरोप-प्रत्यारोप होतच राहिले मात्र तरीही पोस्ट डिलीट न करण्याचं टिळेकर यांनी ठरवलं. मात्र नंतर हा वाद थंड झालेला पाहायला मिळालं.

Recommended

PeepingMoon Exclusive