चित्रपट – झिम्मा
कलाकार – सुहास जोशी, सिध्दार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे
कथा-दिग्दर्शन – हेमंत ढोमे
लेखिका – इरावती कर्णिक
निर्मिती – क्षिती जोग, स्वाती खोपकर
रेटिंग – 3.5 मून्स
प्रवासात विविध प्रकारच्या व्यक्ति भेटतात. कधी कधी त्यांचे ठसे मनावर उमटतात. तर कधी या प्रवासात नवलाईचं खूप काही घडतं. असाच एक समृद्ध करणारा प्रवास ‘झिम्मा’ या चित्रपटातून अनुभवायला मिळतोय. ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत, ‘अमेय विनोद खोपकर एन्टरटेन्मेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित, हेमंद ढोमे दिग्दर्शित आणि इरावती कर्णिकच्या लेखणीतून उतरलेला हा चित्रपट सात महिलांच्या लंडन ट्रीपचा प्रवास आहे. जो पाहुन तुम्ही पोट भरुन हसाल, टचकन डोळ्यातून पाणीही येईल आणि भरपुर मनोरंजनही होईल.
विविध वयोगटातील, विविध स्वभावाच्या महिला टूर गाईड कबीरसोबत लंडनची सफर करण्यासाठी जातात. रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून थोडासा विरंगुळा म्हणून या महिला लंडनच्या सफरीला रवाना होतात. प्रत्येक भूमिकेची एक वेगळी पार्श्वभूमि असणाऱ्या या महिला लंडन फिरताना कशा स्वत:चा शोध घेतात हे चित्रपटात पाहणं महत्त्वाचं ठरतय.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा टूर गाईड कबीरच्या भूमिकेत आहे. तर सुहास जोशी, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्री लंडन सफरीसाठी गेलेल्या महिलांच्या भूमिकेत दिसतात. यात इंदू, मैथिली, निर्मला, मीता, वैशाली, कृतिका, रमा अशा त्यांच्या भूमिका आहेत. तर दिग्दर्शक हेमंत ढोमे देखील या चित्रपटात निखील ही व्यक्तिरेखा साकारतोय.
“जुळली नाती अन, तुटल्या चौकटी, हसऱ्या वाटा तू घेना सोबती...” या चित्रपटातील अलविदा या गाण्यातील ओळींप्रमाणे या प्रवासात कशी नाती जुळतात, जुनाट चौकटीला तोडून या महिला कशा प्रवासाचा मनमुराद आनंद लुटतात हे चित्रपटात पाहणं रंजक ठरतं.
इरावती कर्णिकच्या सुंदर लेखणीने या कथेत जीव ओतलाय. कथेतील पात्रलेखन या चित्रपटाची जमेची बाजू वाटते. दिग्दर्शक हेमंत ढोमेने प्रत्येक पात्राचे बारीक विश्लेषण सहज पद्धतिने चित्रपटात मांडले आहेत. सुटसुटीत पटकथा, उत्तम संवादांनी चित्रपटाची शोभा वाढवली आहे. संवादात कुठेही भापटपसारा नसल्याने ते रटाळ वाटत नाहीत.
या चित्रपटात विविध पिढी आणि अभिनयातील विविध शैली असलेले कलाकार लाभल्याने सात महिलांचे सप्तरंगी सूर चित्रपटातील कथेला न्याय देतात. अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी साकारलेली निर्मला पाटील संपूर्ण चित्रपटात चांगलीच भाव खावून जाते. निर्मिती सावंत यांनी प्रत्येक सीनमध्ये कमाल अभिनयकौशल्य दाखवलय. त्यांच्या विनोदी शैलीने विनोदी सीन्समध्ये त्या जबरदस्त लाफ्टर मिळवतात. तर अभिनेत्री सुहास जोशी यांनी साकारलेली इंदू भावणारी आहे. इंदूच्या भूमिकेतील विविध पैलू त्यांनी उत्तम सादर केल्यात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नात्यातील गुंत्यात गोंधळलेली मैथिलीची भूमिका साकारलीय. या भूमिकेतील बारकावे सोनालीने सहज सुंदर पद्धतिने सादर केले आहेत. क्षिती जोगचा कमालीचा अभिनय लक्ष वेधून घेतो. मीताच्या भूमिकेत ती लक्षवेधी ठरतेय. तर वैशालीच्या भूमिकेतील सुचित्रा बांदेकर, कृतिकाच्या भूमिकेतील सायली संजीव, रमाच्या भूमिकेतील मृण्मयी देशपांडे यांनीही छान काम केलय.
अभिनेता सिध्दार्थ चांदेकर हा टूर गाईड कबीरची भूमिका साकारतोय. त्याचे आणखी सीन्स असते तर पाहायला मजा आली असती. कबीरच्या भूमिकेतील कंगोरे त्याने उत्तमरित्या साकारले आहेत.
चित्रपटाचा भाव उत्तम पद्धतिने पोहोचवण्यासाठी कॅमेरा हा तत्पर असतोच. यात संजय नेमाणे यांनी लंडनची नयनरम्य दृश्ये सुंदर टीपली आहेत. लंडनमधील सुंदर दृश्यांमुळे हा चित्रपट पाहायला चकचकीत वाटतो. आदित्य बेडेकरचं बॅगराउंड स्कोअर आणि अमीतराजचं संगीतही छान झालय. चित्रपटातील गाणी अर्थपूर्ण आणि श्रवणीय आहेत. फैझल महाडीक आणि इम्रान महाडीक यांची एडिटिंगही चांगली वाटतेय. चित्रपटातील काही महत्त्वाचे सीनही सहज सोप्या पद्धतिने सादर केले आहेत. त्यामुळे त्या मोजक्या सीन्सचा प्रभाव कमी वाटतो.
संपूर्ण कुटुंबासोबत पाहावा आणि अनुभवता येईल असा हा प्रवास आहे. ही लंडन सफर तुम्हाला काही सुखद क्षण, मनमुराद हास्य आणि एका वेगळ्या प्रवासात घेऊन जाईल एवढं नक्की.