कोरोनाग्रस्त परिस्थितीतमुळे महाराष्ट्रात चित्रीकरणाला बंदी असल्यामुळे मनोरंजन विश्वातील चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर होत आहे. यात आता मराठी मालिकांच्या चित्रीकरणालाही महाराष्ट्राबाहेर सुरुवात झाली आहे. गोवा, सिल्वासा, गुजरात, बेळगाव अशा महाराष्ट्राबाहेरील राज्यात विविध मालिकांचे चित्रीकरण केले जात आहे.
रंग माझा वेगळा या प्रसिद्ध मालिकेच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे या मालिकेचं चित्रीकरण सध्या गोव्यात सुरु आहे. नुकत्याच या मालिकेचे नवे भाग प्रसारित करण्यात सुरुवात झाली होती. गेले काही दिवस या मालिकेचे रिपीट एपिसोड पाहायला मिळत होते. दीपाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात कार्तिक येऊन कसा गोंधळ घालतो इथपर्यंत पाहायला मिळत होतं. मात्र आता दीपा घर सोडून जात असल्याचा सिक्वेन्स पाहायला मिळतोय.
नुकताच या मालिकेतील कलाकारांनी शूटिंग लोकेशन्सवरील त्यांचे फोटो शेयर केले आहेत. गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात हे चित्रीकरण सध्या सुरु आहे. मालिकेच्या सिक्वेन्समध्ये दीपा घर सोडून जात असल्याने लोकेशन बदलल्यानंतर त्याचा फायदा झाला असल्याचं हे कलाकार सांगतात. या मालिकेतील कार्तिक, दीपा, श्वेता, आदित्य, सौंदर्या या महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी मिळून नुकतच प्रेक्षकांसोबत संवाद साधला आहे. या कलाकारांनी सोशल मिडीयावर लाईव्ह येऊन प्रेक्षकांशी संवाद साधला आहे.