बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच घरात वाद पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरात कुणाना कुणाला टार्गेट केलं जातं. तसच विकास पाटीलच्या बाबतीत झालेलं पाहायला मिळतय. एकीकडे घरात दोन गट झालेले असताना बिग बॉसने स्पर्धकांना दोन गटांचा टास्क दिला. ज्यात घरात तयार झालेले दोन गट एकमेकांसमोर भिडले. स्पर्धकांना देण्यात आलेल्या हल्लाबोल टास्कमध्ये स्पर्धक उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत.
यातच मीरा आणि टीम दुसऱ्या गटाला विविध टोमणे मारताना पाहायला मिळतय. यातच आणखी एक वाद बिग बॉस मराठीच्या घरात आठव्या दिवशी पाहायला मिळणार आहे. यात मीरा आणि विकास यांच्यामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटली आहे. हल्लाबोल टास्क दरम्यान मीरा आणि विकासमध्ये वाद झाला होता. यावेळी मीरा टोमणे मारत असताना त्याने तिला खुलं चॅलेंज दिलं होतं.
मात्र आजच्या भागात स्टोअर रुममध्ये जाताना मीरा आणि स्नेहाने विकासवर धक्का मारल्याचा आरोप केलाय. ज्यात दोघी विकासवर धक्का मारल्यामुळे आरडाओरड करताना दिसतील. मात्र या दोघी वुमन कार्ड खेळत असल्याचं उत्तर विकास त्यांना देणारेय.