गेले कित्येक महिने कॅन्सरशी दोन हात करणारी बॉलिवूडची गुणी अभिनेत्री सोनाली बेंद्रे काही महिन्यापूर्वीच भारतात परतली. तब्बल पाच महिने न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतल्यानंतर ती भारतात परतल्याने सिनेसृष्टीसह तमाम चाहत्यांनासुध्दा खुप आनंद झाला. तिच्या या कॅन्सरच्या लढ्यात तिचे पती गोल्डी बहल यांची तिला खंबीर साथ लाभली. आता उपचार घेऊन भारतात परतल्यानंतर काही वेळ मुलगा रणवीर आणि कुटुंबियांसोबत घालवल्यानंतर सोनालीने पुन्हा बॅक टू वर्क मोड ऑन केला आहे.
इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत आणि एक मेसेज पोस्ट करत सोनालीने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. " विविध पातळ्यांवर विविध प्रकारे स्वत:ला तपासल्यानंतर आता पुन्हा बॅक इन अॅक्शन येण्याचा आनंद अवर्णनीय आहे. कॅमे-याला पुन्हा सामोरं जाणं हा अद्वितीय अनुभव असणार आहे. ही एक सुंदर भावना आहे."
https://www.instagram.com/p/BtYgvIwhIis/?utm_source=ig_embed
कॅन्सरशी झुंज देताना सोनालीने आपल्या आयुष्यातील अनेक घडामोडींबद्दल सोशल मिडीयाद्वारे भावनांना वाट मोकळी करुन दिली. आता सोनाली कोणत्या शोच्या माध्यमातून ऑन-स्क्रीन दिसणार आहे अद्याप स्पष्ट झालं नसून ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.