‘पाहिले न मी तुला’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे, तन्वी मुंडले, आशय कुलकर्णी सोबत प्रथमच नकारात्मक भूमिका साकारणारा शशांक केतकर देखील प्रेक्षकांना भावतो आहे.
ही कथा आहे, मानसी आणि अनिकेतच्या अतूट प्रेमाची आणि विश्वासाची. हे प्रेम समरच्या विक्षिप्त नजरेत येतं. तिथूनच मानसी आणि अनिकेतच्या आयुष्यातील ससेहोलपट सुरू होते.
मनुचे वडील तिच्यासाठी स्थळ शोधण्याचा सपाटा लावतात..समर मनूच्या आई वडिलांवर स्वतःची छाप टाकण्यासाठी तिचं लग्न लावून देण्याची जबाबदारी घेतो. मनुला हा धक्का सहन होत नाही, जर समरने कोणी मुलगा समोर उभा केला तर आई वडील लगेच तयार होतील, अशी तिला खात्री होते. मनू अनिकेतला सांगते की "आता आपल्यासमोर काही पर्याय उरला नाहीये, दुसऱ्या कोणासोबत लग्न करण्याचा विचार ही मी करू शकत नाही", अखेर नाईलाजाने मनू अनिकेत घरच्यांना अंधारात ठेवून लग्न करतात. त्यांच्या ह्या प्रेमाच्या नात्याला नवी ओळख मिळाल्याने दोघेही प्रचंड आनंदी आहेत. पण घरच्यांपासून हे सत्य लपवण त्यांना पटत नाही. दोघे मिळणं धीर एकवटून घरी त्यांचं लग्न झालं हे सांगायचं ठरवतात.
परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच आहे. देसाईंच्या घरावर अनाहूतपणे संकट कोसळत. त्यामुळे राजन देसाईंची तब्येत बिघडते, घरचं वातावरण डळमळीत होतं. ह्या प्रकाराने मनुचा धीर खचतो. अनिकेत सांगतो, जोवर हे संकट दूर होत नाही तोवर आपण लग्नाविषयी कोणाला काही सांगायचं नाही. पण समर च्या मनात काहीतरी वेगळंच आहे, तो देसाई घरावर आणि मनुवर आलेल्या ह्या कठीण परिस्थितीचा गैरफायदा घेऊ लागतो. पाठीवर छुपे वार करणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या समरला अनिकेत मानसी कसे सामोरे जातील हे या मालिकेत पुढे पाहायला मिळणार आहे.