'आई कुठे काय करते' या मालिकेत बरेच चढउतार पाहायला मिळत आहेत. एकीकडे इशाच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती त्यांची भांडणं विसरुन सध्या इशाकडे लक्ष केंद्रीत करत आहेत. तर दुसरीकडे अभिषेकच्या लग्नाची तयारी सुरु होणार आहे.
सध्या इशा आणि अभिषेकमुळे अनिरुद्ध आणि अरुंधती एकत्र आले आहेत. आपल्या मुलांसाठी सध्या दोघं एकत्र राहत असल्याचं पाहायला मिळतय. मात्र लवकरच दोघांचा घटस्फोट होणार आहे. इशा आणि आजी मात्र हा घटस्फोट न होऊ देता अनिरुद्ध आणि अरुंधतीला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
इशाला तिची चूक लक्षात आली आहे. मात्र इशाच्या आनंदासाठी अनिरुद्ध आणि अरुंधती घरात हसतं खेळतं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्यात हे दोघं पुन्हा एकदा पति-पत्नी सारखे एकत्र वागताना दिसत आहेत. दोघं एकत्र हसतात, गप्पा मारतात हे पाहुन इशा आणि आजीला आशेचा किरण दिसतोय. तेव्हा इशा आणि आजी या दोघांना पुन्हा पहिल्यासारखं एकत्र आणतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.